तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २२ कोटींचा निधी मंजूर
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे । सह्याद्री लाइव्ह । तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1015 कोटींचा निधी मंजूर केला होता, मात्र त्यानंतर या रस्त्यावर एलिव्हेटेड मार्ग बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यामुळे हे काम सुरू होण्यास लागणारा विलंब आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तळेगाव-चाकण-शिक्रापूर व पुणे-शिरूर या दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी निधी देण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी दुरुस्तीसाठी 22 कोटींचा निधी मंजूर केला होता.
ऑक्टोबर महिन्यातच या दोन्ही महामार्गावरील दुरुस्तीची कामे सुरू होणे अपेक्षित होते. परंतु यंदा पावसाळा लांबल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते. आता पाऊस थांबला असल्याने तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांना दिले. त्यानुसार दुरुस्तीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आज खेड तालुक्यातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असून खालुंब्रे येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.
ज्या ठिकाणी रस्ता पूर्णतः खराब झाला आहे, त्या ठिकाणी खड्डे बुजवून उखडलेल्या संपूर्ण भागाचे डांबरीकरण करण्यात येणार असून या दुरुस्तीसह देखभालीची जबाबदारीही या कंत्राटदारावरच असल्याने आगामी काळात रस्त्यांची वेळोवेळी दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे रस्ता सुस्थितीत होऊन वाहतूक लवकरच सुरळीत होईल, असेही खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले.
यासोबतच तळेगाव-चाकण-शिक्रापूर येथे एलिव्हेटेड कॉरिडॉर होण्याच्या कामास लवकरात लवकर मूर्त स्वरूप यावे, यासाठीही पाठपुरावा मी सुरू ठेवणार आहे, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.