खेडमध्ये 1717 हेक्टर क्षेत्र बाधित
कृषी विभागाचा नजर अंदाज : भरपाई देण्याची किसान कॉंग्रेसची मागणी
राजगुरूनगर – खेड तालुक्यात बुधवारी (दि. 1) झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी विभागाच्या नजर अंदाजामध्ये तालुक्यात जवळपास अंदाजे 116 गावांमधील 1717 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सुमारे 4748 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी खेड तालुका किसान कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यात मागील आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, ज्वारी तसेच पालेभाज्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने या नुकसान क्षेत्रातील पिकांची पाहणी व पंचनामे करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच आपत्ती व्यवस्थापन निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीचे निवेदन खेड तालुका किसान कॉंग्रेसने तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना दिले आहे. यावेळी पुणे जिल्हा किसान कमिटीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे, तालुका अध्यक्ष सुभाष होले, पंचायत समितीचे माजी सभापती सतीश राक्षे, निलेश कड, भगवान मलघे, बाळासाहेब गायकवाड, गुलाब मलघे, प्रभू गाडे, सुरेश मलघे, चंद्रकांत चव्हाण, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त पिके
खेड मंडळमध्ये ज्वारी 400 हेक्टर, कांदा रोपे 32 हेक्टर, कांदा पिक 335 हेक्टर, वाडा मंडळामध्ये भात 3 हेक्टर, ज्वारी 280 हेक्टर, कांदा पीक 145, बटाटा 40 हेक्टर, हरभरा 238 हेक्टर, इतर कडधान्य 179 हेक्टर, पाईट मंडळमध्ये ज्वारी 5 हेक्टर, कांदा पीक 21 हेक्टर हरभरा 25 हेक्टर, भाजीपाला 14 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.