आधारभूत किंमत व्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार प्रोत्साहनपर रक्कम
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत व्यतिरिक्त प्रति हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य राजू कारेमोरे, प्रकाश आबिटकर, सुनील भुसारा आणि अनिल देशमुख यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेसंदर्भातील प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
मंत्री चव्हाण म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम देण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांचा शेतीचा वाढता खर्च आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेअंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत आहे. डिसेंबर 2022 मध्ये हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मार्यादेत प्रति हेक्टर 15 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.