सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२० वा पदवीप्रदान समारंभ संपन्न
पुणे : केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असून शैक्षणिक क्षेत्रात करण्यात येत असलेल्या आवश्यक सुधारणामुळे महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२० व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक) चे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक व अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनखाली नव्या शैक्षणिक धोरणाचा मसूदा तयार करण्यात आला आहे. केंद्राने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केल्यानंतर देशातील पहिली प्राध्यापक प्रबोधिनी पुणे येथे स्थापन झाली. इन्फोसिससारख्या संस्थेशी याबाबत करार करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विविध प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल. या संपूर्ण प्रक्रीयेत विद्यापीठाचा सहभाग महत्वाचा आहे. विद्यापीठ आणि शासनाने समन्वीत प्रयत्न केल्यास राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल बदल घडवून आणता येतील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अन्या विद्यापीठांना अनुकरण करण्यासारख्या चांगल्या बाबी आहेत. विद्यापीठाने इतरही देशातील विद्यापीठांशी करार केला आहे. प्रत्येक विद्यापीठाने आपला अभ्यासक्रम बाहेरच्या देशात जाईल यासाठी विशेष प्रयत्न करावे. त्यानिमित्ताने आपले ज्ञान, संस्कृती इतर देशात जाते, असेही ते म्हणाले.
राज्यातील विद्यापीठांनी पदवीप्रदान समारंभासाठी एक दिवस निश्चित करावा आणि एकाच दिवशी राज्यातील सर्व विद्यापीठात हा समारंभ व्हावा. यामुळे एका दिवशी लाखो पदव्या देणारे राज्य म्हणून राज्याची ओळख होईल. इतरही विद्यार्थ्यांनी पदवीदान समारंभापासून प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांना पदवीदान कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. कुलगुरु डॉ.करमळकर यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात वेगळा आदर्श उभा केला आहे, असे ते म्हणाले.
मराठी भाषेच्या विकासासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. येत्या वर्षभरात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला गती देण्याचे काम करण्यात येईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.