खेडमधील 68 गावांत 100 टक्के लसीकरण
खेड – तालुक्यातील करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात 68 गावांतील 18 वयोगटा पुढील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉं. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी 16 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या “हर घर दस्तक’ योजनेतून 7 हजार 614 घरांना भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन लसीकरणाचा डोस न घेणाऱ्या 14 हजार 673 नागरिकांना पहिला डोस तर 37 हजार 675 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. 16 नोव्हेंबरपासून फिरत्या रुग्णवाहिकेमधून ‘व्हॅंकसीन ऑन व्हील’ या मोहिमेतंर्गत तालुक्यातील 6 हजार 235 नागरिकांपैकी 2 हजार 906 नागरिकांना पहिला, तर 3 हजार 329 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.
तालुक्यातील 18 वयोगटापुढील 3 लाख 37 हजार 290 नागरिकांपैकी 3 लाख 33 हजार 909 नागरिकांचा पहिला, तर 2 लाख 20 हजार 61 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला, असे एकूण 5 लाख 35 हजार 970 लसीचे डोस वापरण्यात आले. अद्यापही 3381 नागरीकांनी लसीचे डोस घेतले नसल्याचे आकडेवारीनुसार समोर येत आहे, तर पहिला डोस घेणा-या नागरिकांपैकी 1 लाख 31 हजार 848 नागरीकांचा दुसरा डोस देणे बाकी आहे.
आरोग्य यंत्रणा अलर्ट नाही
खेड तालुक्यात आज अखेर लसीकरणाचा आढावा पहाता आरोग्य सेवेतील 3 हजार 190 जणांचा पहिला तर 2 हजार 190 जणांचा दुसरा डोस पूर्ण होऊन तब्बल 1 हजार आरोग्य सेवा देणाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर असताना शासनाने दोन्ही डोस प्रमाणपत्र सादर न केल्यास पगार रोखणार असल्याचा इशारा दिला असताना मात्र अद्याप तरी शासकीय आरोग्य यत्रंणा अलर्ट नसल्याचे समोर आले आहे. हीच अवस्था ‘फ्रंट लाइन वर्कर’मध्ये दिसून येत आहे. 14,678 जणांचा पहिला, तर 7,804 जणांचा दुसरा डोस झाला.