हद्द झाली: फायनलला पोचला रवी कुमार; चाहते आभार मानतायत सलमान, आमीर खानचे
सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी खेळाडूंना प्रोस्ताहन दिल्याबद्दल आमिर आणि सलमानचे आभार मानले.
सध्या जगभरातील खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपलं कौशल्यपणाला लावत आहेत. यातच संपूर्ण भारतीयांचं लक्ष आहे ते म्हणजे भारतीय खेळाडूंवर. अनेक भारतीय खेळाडू जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर विविध पदकं पटकावत आहेत. यातच आता भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्चित झालं आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव केलाय. त्यामुळे भारताचं रौप्य पदतं पक्क झालंय.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी मेडल जिंकणारा रवीकुमार दहीया पाचवा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी के. डी. जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या चार खेळाडूंनी भारतासाठी मेडल जिंकण्याची कमाल केली होती. रवीकुमारने फायनलमध्ये प्रवेश करताच संपूर्ण भारतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र यात अनेक नेटकऱ्यांनी रवी कुमारला शुभेच्छा देत असतानाच सलमान खानच्या ‘सुलतान’ आणि आमिर खानच्या ‘दंगल’चे आभार मानले आहेत.
आमिर खानचा ‘दंगल’ आणि सलमान खानचा ‘सुलतान’ हे दोन्ही सिनेमा कुस्तीवर आधारित होते. शिवाय हे सिनेमा चांगलेच सुपरहीट ठरले होते. हे दोन्ही सिनेमा कुस्तीपट्टूंना प्रेरणा देणारे होते आणि त्यामुळेच आज रवीकुमारच्या विजयानंतर सोशल मीडियावर लोक सलमान खान आणि आमिर खानचे आभार मानत आहेत.
एका नेटकऱ्याने ट्वीट करत म्हंटलं आहे, “मस्त रवीकुमार..पण सर्वप्रथम सलमान आणि आमिरचे त्यांच्या ‘सुलतान’ आणि ‘दंगल’ या सिनेमासाठी आभार कारण या सिनेमांमधून त्यांनी तरुणांना कुस्तीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहण्यासाठी प्रोत्साहन दिलं.” असं युजर म्हणाला.
तर आणखी एक युजर म्हणाला, “दंगल सिनेमा पाहिल्यापासून मी कुस्ती या खेळाच्या प्रेमात पडलो आहे. मात्र आजची लढत पाहून मी या खेळाच्या आणखीनच प्रेमात पडलोय. ” असं म्हणत युजरने रवी कुमारला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.