सर्वेक्षणातून पालिकेला सव्वा तीनशे कोटींचा फायदा
19 हजार नवीन मिळकतींचा शोध - टॉवर, रहिवाशी, बिगर रहिवाशी मिळकतींचा समावेश
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नोंद नसलेल्या जुन्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामधून 19 हजार 648 कर न भरणाऱ्या मिळकतीचा शोध लागला आहे. त्यामुळे या मिळकती आता महापालिकेला जोडल्या गेल्या असून त्यांच्या करातून महापालिकेला तब्बल सव्वा तीनशे कोटींच नफा होणार आहे. या मिळकतींची बिले वसूल करण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडे साडेपाच लाख मिळकतींची नोंद आहे. त्यातून महापालिकेला कररुपाने पैसे मिळतात. मात्र हजारो मिळकतींची नोंद नसल्याने महापालिकेचे अर्थिक नुकसान होते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने नोंद नसलेल्या मिळकतींचे खासगी संस्थेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. सुरूवातीला या संस्थेला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. नंतर पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्यात आली. या संस्थेने सहा महिने सर्वेक्षण करून शहरातील 19 हजार 648 नोंद नसलेल्या मिळकती शोधल्या आहेत. नोंद नसणे, वाढीव बांधकाम करणे, वापरात बदल करणे अशा निवासी, बिनरनिवासी, औद्योगिक, मिश्र मिळकतीचा शोध घेण्यात आला आहे.
या खासगी संस्थेने एकूण 19 हजार नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेतला आहे. प्रत्येक बिलाच्या रकमेवर संबंधित एजन्सीला 6.60 टक्के शुल्क दिले जाणार आहे. त्यात 350 मोबाईल टॉवर्स तसेच, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल, वर्कशॉप, नामांकित कंपन्या, हॉटेल्स, ऑफिसेस, व्यापारी गाळे, हाउसिंग सोसायट्या, नव्याने झालेल्या सदनिका आदींचा समावेश आहे. आतापर्यंत 5 हजार 325 मिळकतींना बिलांसह नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित मिळकतींबाबत प्रक्रिया सुरू आहे. सर्वांधिक मिळकतींची नोंद थेरगाव, किवळे, चिखली व मोशी या भागांत झाली आहे. या नव्या मिळकतींमुळे पालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी 325 कोटींची वाढ होणार आहे. प्रत्येक बिलाच्या रकमेवर संबंधित एजन्सीला 6.60 टक्के शुल्क दिले जाणार आहे.
टाटा मोटर्स कंपनीला 200 कोटींचा मिळकतकर
शहरातील नामवंत वाहन उत्पादन कंपनी असलेल्या टाटा मोटर्स कंपनीत तब्बल 8 हेक्टर जागेत केलेल्या बांधकामांची नोंदच पालिकेच्या कर संकलन कार्यालयाकडे नव्हती. कंपनीने सुमारे 8 हेक्टर जागेत सर्व्हिसिंग सेंटर, कॅन्टीन, कार पार्किंग शेड व इतर शेड सन 2008 व 2016 ला उभारले होते. कंपनीकडून प्राप्त झालेल्या बांधकामांसंदर्भातील कागदपत्रांच्या आधारे पालिकेने त्यांना तब्बल 200 कोटींचा औद्योगिक मिळकत कर लावला आहे. तशी नोटीस पालिकेने कंपनीला दिली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या संस्थेच्या वतीने शहरातील नोंद नसलेल्या मिळकती शोधण्यात आल्या आहेत. त्यांना नोटीसाहित बिले देण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत संस्थेच्या कामाची मुदत संपल्याने त्यांचे काम थांबविण्यात आले आहे. दंडासह आकारणी करण्यात येणार आहे. या मिळकतींची नोंद पालिकेकडे झाल्याने पालिकेच्या तिजोरीत 325 कोटींचा कर जमा होणार आहे.
– स्मिता झगडे, उपायुक्त, पिं.चिं. महापालिका.