‘बुलेट ट्रेन’च्या जागेस शिवसेनेचा हिरवा कंदील
ठाणे पालिका सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर
ठाणे पालिका सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर
ठाणे : राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांमुळे तीन वेळा तहकूब आणि एकदा दप्तरी दाखल झालेल्या केंद्र शासनाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव बुधवारच्या सर्वसाधारण सभेत चर्चेविनाच शिवसेनेने मंजूर केल्याने बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ओळखला जातो. या बुलेट ट्रेनचा मार्ग ठाणे पालिका क्षेत्रातील शिळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून जाणार आहे. तसेच म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) काही वर्षांपासून सुरू केली आहे. या प्रकल्पात संपादित होणाऱ्या खासगी जमिनींसाठी प्रति हेक्टर नऊ कोटी मोबादला दर निश्चित केला होता. हा मोबदला देऊन खासगी जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु महापालिकेची जागा मिळत नसल्याने हा प्रकल्प राबविणे शक्य होत नव्हते.
या प्रकल्पासाठी महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील ३ हजार ८४९ चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे. ही जागा प्रकल्पासाठी देण्याची मागणी एनएचएसआरसीएलने पालिकेकडे दोन वर्षांपूर्वी केली होती. तसेच या जागेच्या बदल्यात ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदला देण्याची तयारी दाखविली होती. त्यानुसार मोबदला घेऊन ही जागा एनएचएसआरसीएलच्या नावे करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. गेल्या वर्षभरात तीन वेळा हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आला असता, सत्ताधारी शिवसेनेने तो तहकूब ठेवला होता.
वाद टाळण्याचा प्रयत्न
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मोठे प्रकल्प उभारणीची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांसाठी केंद्राच्या निधीची गरज आहे. हा निधी केंद्राकडून रोखून धरण्यात आला तर, हे प्रकल्प अडचणीत येऊ शकतात. यातूनच केंद्र सरकारच्या प्रकल्पांमध्ये आडकाठी आणू नका आणि या प्रकल्पांबाबत नमते घेण्याची सूचना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.