बालआरोग्य : श्वसनमार्गाचे आजार
आपल्या कुटुंबातील लहान बाळ म्हणजे एक आनंदाचा व चैतन्याचा झरा असतो. साहजिकच असे बाळ आजारी झाले की त्याचा सर्व कुटुंबावर परिणाम होतो.
आपल्या कुटुंबातील लहान बाळ म्हणजे एक आनंदाचा व चैतन्याचा झरा असतो. साहजिकच असे बाळ आजारी झाले की त्याचा सर्व कुटुंबावर परिणाम होतो. त्यात बाळ वारंवार आजारी होऊ लागले की आई-वडिलांच्या चिंतेला पारावर उरत नाही.
साधारणपणे लहान मुलांमध्ये वारंवार आजारी पडण्याची कारणे –
वारंवार येणारा ताप
* वारंवार पोट बिघडणे
* वारंवार होणारी सर्दी, खोकला आणि श्वसनमार्गाचे आजार
लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी, खोकला का होतो?
लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे जंतुसंसर्ग, विषाणूसंसर्ग लवकर होतो. त्यांच्या श्वसनमार्गाचा आकार लहान असल्याने जंतुसंसर्ग कमी वेळात व तीव्र स्वरूपात दिसून येतात. अनेक वेळा घरातील किंवा आजूबाजूच्या संपर्कातील आजारी व्यक्तींमुळे वारंवार सर्दी, खोकला होऊ शकतो. घराची अस्वच्छता, खेळत्या हवेचा अभाव, घरातील आणि घराबाहेरील धूर, धूळप्रदूषण, घरातील पाळीव प्राण्यांचा संपर्क या बाबीदेखील कारणीभूत आहेत. पाळणाघरात, प्लेग्रुपमध्ये जाणाऱ्या बाळांमध्ये एकमेकांकडून जंतुसंसर्ग होऊन वारंवार सर्दी खोकला होतो. कुपोषित बालकांमध्ये गोवर, डांग्या, खोकला, क्षयरोग अशा घातक आजारांमुळे वारंवार खोकला येऊ शकतो.
सर्दी-खोकल्याच्या अनुषंगाने लहान मुलांमध्ये श्वसनमार्गाचे कोणते आजार दिसून येतात?
अगदी लहान म्हणजे १५-२० दिवसांच्या बाळामध्ये शिंकणे, नाक बंद आहे असे वाटणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. बाळ दूध चांगले पित असेल, श्वसनाचा काही त्रास नसेल व व्यवस्थित झोपत असेल तर कोणत्याच उपचाराची गरज नाही. नाक बंद राहिल्यास सलाइन ड्रॉप्सचा वापर करू शकतात. पाच-सहा महिन्यांच्या बाळांमध्ये किरकोळ सर्दी, खोकला व बारीक धाप लागत असेल तर त्याला ब्रोक्रोलिट्स आजार असू शकतो. हा विषाणूंच्या संसर्गाने होतो. श्वसनाला त्रास होत असेल आणि बाळाला दूध पिता येत नसेल तर अशा बाळांना त्वरित उपचार करणे गरजेचे असते.
एक ते दीड वर्षांचे बाळ सर्दी, किरकोळ खोकला, ताप यांमुळे आजारी होऊन कानदुखीची तक्रार करत असेल तर त्याच्या कानाच्या पडद्याला सूज आलेली असू शकते त्याला ‘ओटीस एडिआ’ असे म्हणतात. यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते, अन्यथा कानाचा पडदा फाटून गुंतागुंत होऊ शकते.
साडेचार ते पाच वर्षांच्या बालकांमध्ये वारंवार होणारी सर्दी, खोकला, कायम तोंड उघडे ठेवून श्वास घेणे, रात्री खूप घोरणे, झोपेत श्वास अडकून दचकणे अशी सर्व लक्षणे अॅडेनॉईड ग्रंथीला सूज असल्याचे दर्शवितात. अॅडेनॉईड म्हणजे नाकाच्या आतमधील मागील बाजूला असलेल्या टॉन्सिलसारख्या ग्रंथी. या ग्रंथींना सूज आल्यास बरेच दुष्परिणाम होऊ शकतात. जसे की तोंडाचा आकार बदलणे, कानातून पू येणे, वजन उंची प्रमाणात न वाढणे, याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या ग्रंथीची शस्त्रक्रिया करून काढणे कितपत योग्य राहील हे ठरवावे लागते.
लहान मुलांमध्ये ताप, तापाबरोबर येणारा खोकला, कधी कधी थंडी वाजून येणारा ताप, श्वसनास होणारा त्रास, छातीत दुखणे हे न्यूमोनिआचे लक्षण दाखवते. अशा वेळी बाळावर त्वरित उपचार करणे गरजेचे असते.
बाळाच्या श्वसनाच्या गतीवरून याचे निदान करता येते.
उपचार
सर्दी-खोकल्याच्या आजारात औषधांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय जास्त महत्त्वाचे असतात. घरगुती उपचारात लहान मुलांना विश्रांती, भरपूर झोप, सकस आहार, कोमट पाणी पिणे याचा समावेश असावा. झोपताना लहान मुलांचे डोके उंचावर ठेवावे. नाकात सलाइन ड्रॉप्स टाकावे म्हणजे नाक बंद होणार नाही. विषाणूजन्य आजारात प्रतिजैविकांचा वापर टाळावा. अॅलर्जीची प्रवृत्ती असणाऱ्यांमध्ये संवेदनशील घटकांना टाळणे महत्त्वाचे असते. आजूबाजूचे वातावरण प्रदूषणमुक्त ठेवणे. आजारी नातेवाईकांचा संपर्क टाळणे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे. मुलांना मोकळ्या हवेत खेळण्यास प्रोत्साहित करावे म्हणजे त्यांची प्रतिकारक्षमता वाढते. ताजा, सकस समतोल आहार देणे. जंतुसंसर्गाविरूद्ध परिणामकारक लस उपलब्ध आहेत. विशेषत: न्यूमोनिआ विरोधी लस, गोवर लस, ट्रिपल लस, इन्फ्लुएंझा विरोधी लस हे लसीकरण योग्य वेळी नियमित केल्यास गंभीर आजारपण टाळता येते. बाळाच्या प्रकृतीबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे.
हे लक्षात ठेवा
बाळ एक मिनिटात किती श्वास घेते ते मोजा. जन्मापासून ते दोन महिन्यांपर्यंत बाळ ६० पेक्षा जास्त, २ महिने ते एक वर्षांमध्ये ५० पेक्षा जास्त आणि एक ते पाच वर्ष या वयोगटांतील मूल ४० पेक्षा जास्त गतीने श्वास प्रतिमिनिटाला घेत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कोणत्याही श्वसनमार्गाच्या आजारात बाळ कण्हत असेल, दूध पीत नसेल, लघवी कमी होत असेल, नख-जीभ निळसर वाटत असेल तर त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.