अफगाणिस्तानात बकरी ईदच्या नमाज पठणावेळी रॉकेट हल्ला
अफगाणिस्तानातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अफगाणिस्तानाची राजधानी काबुलमध्ये बकरी ईदच्या प्रार्थनेवेळी रॉकेट हल्ला झाला आहे.
अफगाणिस्तानातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अफगाणिस्तानाची राजधानी काबुलमध्ये बकरी ईदच्या प्रार्थनेवेळी रॉकेट हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकले नाही. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाजवळ हा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. परकीय सैन्याने माघार घेतल्यापासून तालिबान अफगाणिस्तानातील प्रमुख शहरे ताब्यात घेण्यात सुरुवात केली आहे. काबूलच्या पारवान भागातून तीन क्षेपणास्त्रं टाकण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्र बाग-ए अली मर्दन, चमन-ए-हुजुरी भागात पडली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईद-अल-अधाच्या प्रार्थनेदरम्यान हे तीन रॉकेट राष्ट्रपती भवन जवळील भागात पडले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार सकाळी आठ वाजता हे रॉकेट डागण्यात आले. या दरम्यान किलेनुमा ग्रीन झोनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. ग्रीनमधील राष्ट्रपती भवनाव्यतिरिक्त दूतावास आणि जगातील अनेक देशांच्या इतर मोठ्या इमारती या भागात आहेत. या भागात सुरक्षा सर्वात जास्त आहे.