मुंबईकरांना बाल्कनीत रोमान्स करण्यापासून कोण रोखतंय?, सुमीत राघवनने दिलं मजेशीर उत्तर
अभिनेता सुमीत राघवन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सुमीत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. एवढंच नाही तर अनेक वेळा तो त्याचं मत मांडताना दिसतो. आता सुमीतने मुंबईकर गॅलरीत रोमान्स का नाही करू शकत याचं कारण सांगितलं आहे.
एका रेल्वे अधिकाऱ्याने एका जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हे जोडप बाल्कनीत एकमेकांकडे बघत असल्याचे त्यात दिसत आहे. ‘नेहमीच्या धावपळीच्या जीवनाची सुरुवात करण्याआधी, दिवसाची चांगली सुरुवात करण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे?,’ असे त्या फोटोमध्ये लिहिले आहे. त्यावर सुमीतने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘सगळ्यात आधी मुंबईकर बाल्कनीला असं ठेवणार नाही…त्याला बॉक्स ग्रील लावतील..त्यात फुलांची कुंडी ठेवतील, मुलांची सायकल, जुने खोके ठेवतील, कपडे वाळत घालतील, दिवाळीती कंदिल लावतील..या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवत आहेत,’ असे सुमीत म्हणाला. त्याचे हे उत्तर नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहे.