ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना दहा दिवसांपासून उचक्या; रुग्णालयात केलं दाखल
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सनारो यांना गेल्या दहा दिवसांपासून सतत उचक्यांचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर बुधवारी एका चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतड्यांमधील काही समस्यांमुळे असे होत आहे आणि त्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते असे डॉक्टर सांगितले होते. पण नंतर त्यांनी त्वरित शस्त्रक्रिया न करण्यास सांगितले.
अध्यक्षीय कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेर बोल्सनारो (६६) यांना राजधानी ब्राझिलिया येथील सैन्याच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे आणि त्यांची तब्येत आता ठिक आहे. डॉक्टर त्याच्या उचकीच्या समस्येवर उपचार करीत आहेत. पण काही तासांनंतर, दुसर्या निवेदनात, कार्यालयाने म्हटले आहे की, २०१८ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोटावर वार झाल्याने बोलसनोरोवर उपचार करणार्या शल्यचिकित्सकाने त्यांना साऊ पाउलो येथे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे त्यांच्यावर पुढील उपचार केली जातील.
नोव्हा स्टार रुग्णालयने बुधवारी रात्री दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अध्यक्षांवर कॉन्झर्वेटिव्ह क्लिनिकल ट्रीटमेंट सुरु आहे, त्यामुळे आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार नाहीत. बोलसनोरो यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आपल्या रूग्णालयाचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.
२०१८ साली बोल्सनारो यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आतड्यांना दुखापत झाली आणि तेव्हापासून बर्याच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अनेक कार्यक्रमांत त्याला बोलण्यातही अडचण होत होती. ७ जुलै रोजी रेडिओ गुईबाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मला पाच दिवसांपून उचक्या लागत असल्याचे म्हटले होते.