स्मृती आख्यान : मेंदूच्या यंत्रासाठी व्यायामाचं वंगण
अन्न, पाण्याशिवाय शरीर जगू शकत नाही हे आपल्याला माहीत असतं. पण त्याचबरोबर शरीराला शक्ती, उत्साह, आरोग्य यांची साथ मिळण्यासाठी आवश्यक असतो तो व्यायाम.
व्यायामाच्या फायद्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी ताडलं आहे, की व्यायामाचा सर्वप्रथम फायदा कुणाला होत असेल, तर तो मेंदूला होतो. आणि मेंदूला फायदा झाल्यामुळेच तो शरीरालाही जाणवतो. मेंदूचं वय वाढलं तरी त्याला नव्यानं पालवी फुटू शकते, तो फोफावू शकतो, हे आपण बघितलं आहे. नियमित व्यायामामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. त्यामुळे प्राणवायू आणि इतर पोषक द्रव्यांचा सुरळीत पुरवठा होतो. मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात. त्यांना रक्तपुरवठा करण्यासाठी नवीन रक्तवाहिन्यांचे मार्ग तयार होतात. मेंदूतील न्युरोट्रान्समीटर्सचं, प्रथिनांचं उत्पादन वाढतं. मेंदूला होणाऱ्या फायद्यामुळे सर्व शरीरच एखादं झाड बहरावं तसं फुलून येतं, हे पटवून देणारे शेकडो अभ्यास गेल्या दहा-वीस वर्षांतील आहेत. मेंदूचं कार्य सुधारल्यामुळे अभ्यास करताना किंवा नवीन माहिती ग्रहण करताना मेंदू सज्ज असतो. व्यायामानंतर केलेला अभ्यास जास्त काळ स्मरणात राहातो आणि माहिती साठवण्याची पुढील पायरीही पद्धतशीरपणे पार पडते. विचार करण्याची क्षमता वाढते. त्याच्या परिणामामुळे स्मरणशक्तीला नवीन तेज प्राप्त होतं. हे फायदे मिळवायला वर्षानुवर्षं व्यायाम करायला हवा असंही काही नाही. केवळ तीन महिने नियमित व्यायाम करूनही मेंदूतील स्मरणशक्ती टिकवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भागाचं कार्य सुधारलेलं दिसतं. ‘लो इन्टेंसिटी’ एरोबिक स्वरूपाचा व्यायाम करणाऱ्या गटाच्या अभ्यासातून असं दिसलं, की भाग घेणाऱ्यांच्यात मेंदूच्या स्मरणशक्तीसाठी महत्त्वाच्या भागाचा रक्तपुरवठा सुधारला, तसंच स्मरणशक्तीच्या चाचणीमध्येही त्यांची कामगिरी अव्वल ठरली.
लक्षावधी वर्षांपूर्वी जेव्हा मानवजात जन्माला आली, तेव्हापासून अगदी आता आतापर्यंत शरीराची हालचाल केल्याशिवाय माणसाचं जगणं अशक्य होतं. परंतु गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून यंत्रयुगानं मानवी जीवनावर कब्जा करत करत त्यात एवढं परिवर्तन केलं आहे की माणसाची लवचीकताच हरपत चालली आहे. मानवजात अस्तित्वात आल्यानंतर तिचं आयुष्य जगण्यासाठी अन्न गोळा करणं, या एकाच उद्दिष्टाभोवती फिरत होतं. अन्न मिळवण्यासाठी मैलोन्मैल चालणं, डोंगरांची चढउतार करणं, लाकडं तोडणं, इत्यादी केल्याशिवाय अन्नप्राप्ती होत नव्हती. पाच लाख वर्षं हे एकच ध्येय असलेल्या मानवाचं जीवन गेल्या दोनशे-पाचशे वर्षांत अक्षरश: ढवळून निघालं आहे. नैसर्गिक नियमापासून दूर गेल्यानं आपलं आरोग्य ढासळत आहे. अमेरिकेत एकंदर साठ टक्के माणसं स्थूल समजली जातात. आपल्या शहरांमधूनही लठ्ठ माणसं लक्षात येतील एवढ्या संख्येनं दिसून येऊ लागली आहेत. बाळसेदार बाळ छान दिसलं, तरी त्याचं बाळसं हे वाढताना गळून न जाता त्याचा झालेला गोलमटोल बाळ्या हे अनारोगी समाजाचं प्रतीक म्हणायला हवं. आजच्या आरामदायक जीवनशैलीमुळे, हॉटेल संस्कृतीमुळे, वाढत्या ताणांमुळे हृदयविकाराच्या संख्येत काळजी वाटावी इतकी वाढ झाली आहे. मधुमेहाच्या आजारानं घरोघरी शिरकाव केला आहे. मधुमेह हा आपल्याबरोबर इतर रोगांचा शरीरात शिरकाव होऊ देतो. पुरेशी हालचाल न होणारं शरीर म्हणजे उद्याच्या आरोग्यप्रश्नांना आजच निमंत्रण देण्यासारखं आहे. अशा रीतीनं आपल्या आयुष्यरेषेची लांबी आपल्या हातानं आपण कमी करतो आहोत. आरोग्यप्रश्नांनी गांजलेल्या मनाकडून चांगल्या स्मरणशक्तीची अपेक्षा तरी कशी धरू शकणार? सुखसोयींनी समृद्ध असलेलं सद्यकालीन मानवाचं जीवन आदिमानवाच्या जीवनापासून वेगळ्या वळणानं जात असलं, तरी माणसाच्या जनुकांमध्ये कोरलेली जीवनपद्धती अजून पुरातनच आहे. अजूनही जीवनासाठी शरीर लवतं ठेवणं, हेच आपल्या जनुकांना हवं आहे. बहुसंख्यांनी स्वीकारलेलं बैठं जीवन हे निसर्गत: उपयुक्त असलेल्या जीवनपद्धतीपेक्षा भिन्न असल्यामुळे व्यायाम करून शरीराला पुरेसं चलनवलन देणं हाच पर्याय आपल्यापुढे आहे.
व्यायामाचे अगणित फायदे
व्यायाम म्हणजे औषधाची स्मार्ट गोळी आहे. त्यामुळे मिळणारे फायदे नुसते लिहायचे तर पंचवीस पानंसुद्धा पुरायची नाहीत. या फायद्यांवर अविश्वास दाखवायचा मुद्दाच उपस्थित होऊ शकत नाही, कारण जगभरातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांत झालेल्या अक्षरश: शेकडो, हजारो अभ्यासांनी या फायद्यांची ग्वाही दिलेली आहे. शिवाय व्यायामाच्या विरुद्ध कुठलाही पुरावा मिळालेला नाही.
डॉ. जॉन रेटी, हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयातील मानसशास्त्राचे प्राध्यापक व्यायामाबद्दल आपल्या पुस्तकात लिहितात, ‘मेंदूचं कार्य सुधारण्यात व्यायामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो व्यायामाची कास धरेल, तो आपल्या आय़ुष्याचा मार्ग बदलेल, पुढे येणारे अनारोग्याचे काटे आपल्या वाटेवरून दूर करेल आणि आपली जीवनवेल बहरून टाकेल.’ व्यायामाच्या प्रमुख फायद्यांकडे नजर टाकली, तर आपल्याला असं दिसेल की व्यायाम आपल्या प्रयत्नांची सव्याज फेड करतो.
व्यायामामुळे मेंदूची कार्यशैली सुधारते, हा व्यायामाचा खरा फायदा आता लक्षात येत आहे. हृदयासाठी, फुफ्फुसांसाठी व्यायाम चांगला आहे हे व्यायामाचे उपफायदे. व्यायामाचा सर्वांत प्रमुख फायदा मेंदूचं तजेलदारपण हा आहे. मेंदूचं कार्य सुधारल्यामुळे स्मरणशक्तीही सुधारते. मेंदू हा एक स्नायू आहे असं समजलं, तर व्यायामानं जसे हातापायाचे स्नायू मजबूत होताना दिसतात तसा मेंदूसुद्धा शक्तिमान होतो हे मान्य करण्यात दुमत नसावं. जसा मेंदूचा आपल्या वागण्यावर परिणाम होतो तसंच आपल्या वागण्यानं मेंदू प्रफुल्लित होईल की नाही हेही ठरतं. व्यायाम करण्यानं मेंदूकडे आपण नुसतं लक्षच देतो असं नव्हे, तर त्याला जीवन देतो.
व्यायामामुळे हृदय आणि फुफ्फुसांचं कार्य सुधारतं. उच्च रक्तदाब आटोक्यात राहातो. तो कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी होतो. त्यामुळे रक्तपुरवठा जास्त सुरळीत होतो.
आयुष्यात उदासीनता जाणवत असल्यास, मानसिक दौर्बल्य आलं असल्यास, औषधांपेक्षाही व्यायामाचा उपयोग जास्त होतो. व्यायामामुळे औदासीन्य कमी होऊन, उत्साहवर्धन होतं. काळजी दूर पळते, तणाव कमी होतात. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून नीरस आयुष्यातून बाहेर पडायचा मार्ग दिसतो. निराशाजनक परिस्थितीमध्ये व्यायाम केल्यानं मनावरचं काळजीचं सावट दूर होऊन, शांत मनानं विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थितीतून मार्गक्रमण करणं शक्य होतं, असंही वेगवेगळ्या संशोधनांतून दिसतं.