पर्यावरण अहवालात काळेबेरे!
सद्यस्थितीला बगल : योजना पुस्तिका असल्याची टीका
प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि. 1 – महापालिकेचा पर्यावरण अहवाल हा शहराची सद्यस्थिती दर्शविण्याऐवजी महापालिकेच्या विविध योजना आणि प्रकल्पांची माहिती देणारी पुस्तिका आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अहवालातील आकडेवारी आणि सद्यस्थिती यातही तफावत असून, उपाययोजनांचे विश्लेषणही अहवालात नसल्याची प्रतिक्रिया पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेने “पर्यावरण सद्यस्थिती अहवाल -2020-21′ नुकताच प्रकाशित केला. याबाबत “प्रभात’ने पर्यावरण अभ्यासकांशी संवाद साधला. यावर “हा अहवाल अतिशय निराजाजनक असून, यामधील माहिती आणि सद्यस्थिती यामध्ये मोठी तफावत आहे,’ असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. सोबतच ज्या योजनांच्या अंमलबजावणीबद्दल महापालिकेने नमूद केले आहे, त्यामुळे नेमका काय बदल झाला, पर्यावरणासाठी त्याचा काय फायदा झाला? याबाबत विश्लेषण अहवालात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
स्मशानभूमी परिसरातील प्रदूषणाचा उल्लेखही नाही
शहरात करोनामुळे जवळपास साडेआठ हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर शहरातील विविध स्मशानभूमींत अंत्यसंस्कार करण्यात आले. या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी स्मशानभूमींवर ताण पडला होता. तसेच या काळात या स्मशानभूमींमुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याचे आणि त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना त्रास झाल्याच्याही अनेक तक्रारी आल्या. मात्र, पर्यावरण अहवालात याबाबत कोणताच उल्लेख नाही.
हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे पर्यावरण अहवालात म्हटले आहे. यासाठी सायकल ट्रॅक बांधणे, सीएनजी-इलेक्ट्रिक बसचा समावेश, मेट्रो प्रकल्प, रस्ते आणि पदपथ बांधणी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र सायकल ट्रॅकमुळे किती नागरिक नियमित सायकल वापरासाठी प्रोत्साहित झाले? त्याचा खरोखर वापर होतो का? सीएनजी, इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषणात किती घट झाली? वाहनांव्यतिरिक्त प्रदूषणाचे इतर स्रोत आणि त्यावरील उपाययोजना यांबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही. महत्वाचे म्हणजे महापालिका या अहवालाला गांभीर्याने घेत त्यावर काही कारवाई करते का? हा मोठा प्रश्न उपस्थित होतो.
– सुजीत पटवर्धन, “परिसर’ संस्था
पर्यावरण अहवालात नदीतील प्रदूषणात विशेषत: “सीओडी’मध्ये घटल्याचे नमूद आहे. मात्र, नदी-तलावांत वाढती जलपर्णी तर वेगळेच चित्र दर्शवते. जलपर्णीच्या वाढीसाठी नायट्रेट आणि फॉस्फेट ही दोन रसायने अतिशय पोषक असतात. ज्याअर्थी जलपर्णी वाढत आहे त्याअर्थी नदी-तलावांतील पाण्यात या रसायनांची उपलब्धता अधिक आहे. मग नदीतील रासायनिक प्रदूषकांमध्ये घट झाली असल्याचे कसे म्हटले जाऊ शकते? या अहवालात नदी पात्रातील राडारोड्याबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही. जैवविविधतेच्या नोंदींमध्ये नदीपात्रातील वनस्पतींची नावेच नाहीत. वृक्षतोड, पुनर्लागवड याबाबतही माहिती नाही. एकूणच माहिती आणि आकडेवारी यात बरीच तफावत दिसून येते.
– शैलजा देशपांडे, “जीवितनदी’ संस्था