देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, गतवर्षी नवी मुंबई महापालिका देशात तिसरी तर राज्यात पहिली आली होती.
‘नंबर पहिला’च्या आशा उंचावल्यानवी मुंबईला हागणदारीमुक्त विभागातील सर्वोच्च ‘वॉटर प्लस’ मानांकन; स्वच्छता सर्वेक्षणात मोठी आघाडी
नवी मुंबई : गेली वर्षभर स्वच्छता अभियानात ‘निश्चय केला नंबर पहिला’ असे ध्येय ठेवून काम करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला हागणदारीमुक्त विभागातील सर्वोच्च ‘वॉटर प्लस’ मानांकन मिळाले आहे. यात राज्यातील एकमेव नवी मुंबई शहर तर देशातील चार शहरांचा समावेश आहे. त्यामुळे शहर सर्वेक्षणाच्या मुख्य स्पर्धेत कायम राहिल्याने ‘नंबर पहिला’च्या आशा उंचावल्या आहेत.
देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, गतवर्षी नवी मुंबई महापालिका देशात तिसरी तर राज्यात पहिली आली होती. त्यामुळे यंदाच्या सर्वेक्षणात ‘देशात प्रथम’ येण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवत गेले वर्षभर करोनाशी लढत असतानाही काम केले आहे. यातील हागणदारीमुक्त विभागातील पहिला निकाल आला असून हागणदारीमुक्त शहरांच्या (ओडीएफ) श्रेणीमधील सर्वोच्च असणारे ‘वॉटर प्लस’ हे मानांकन मिळवले आहे.
शहर हागणदारीमुक्त पूर्वीच झाले आहे. मात्र ते कायम राहावे यासाठी महानगरपालिका दक्ष आहे. ‘गुड मॉर्निग पथकांद्वारे याकडे लक्ष दिले जात आहे. शहरात ३९४ सार्वजनिक सामुदायिक, २२० सार्वजनिक, तर २० ‘ई टॉयलेट’ आहेत. तसेच महिलांकरिता सहा विशेष शौचालयेही आहेत. याशिवाय झोपडपट्टी भागात ५ हजार ०९४ घरगुती शौचालये अनुदानातून बांधली आहेत. शहराला पुरेशी शौचालयांची निर्मिती करून प्रशासन थांबले नाही तर महिला शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनची सुविधा करण्यात आली आहे. दैनंदिन स्वच्छता ठेवली जात आहेच शिवाय यावर नागरिकांचेही लक्ष राहावे यासाठी शौचालयांत ‘क्युआर कोड बेस्ड’ प्रणाली बसविण्यात आली आहे. शौचालयांचा वापर केल्यानंतर नागरिकांना आपला तत्काळ अभिप्राय नोंदवता येत आहे. अपंगांसाठी विशेष शौचालयांबरोबर मुलांकरिता ‘बेबी टॉयलेट’चीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नालेसफाईसाठी नावीन्यपूर्ण योजना, सांडपाण्याच्या टाकीची अत्याधुनिक वाहनांद्वारे सफाई आणि मलप्रक्रिया केंद्रात पुढील प्रक्रियेसाठी नियमित प्रणाली कार्यान्वित केली आहे. या सर्व कामाचे बक्षीस म्हणून महापालिकेला हागणदारीमुक्त सर्वेक्षणात ‘वॉटर प्लस’ हे मानांकन मिळाले आहे.
या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्तांनी नवी मुंबईकरांचे अभिनंदन केले असून स्वच्छता ही नियमित राखण्याची गोष्ट असल्याने हे मानांकन टिकविण्यासाठी आपण नेहमीच सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहनही केले आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणाअंतर्गत हागणदारीमुक्ततेतील सर्वोच्च मानांकन मिळविल्यानंतर स्वच्छतेत देशात प्रथम येण्याच्या आशा उंचावल्या आहेत.