दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांना जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याची इच्छा नव्हती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली : जिल्हा बॅंकेबाबत अनेकांनी शक्यता वर्तविल्याने अर्ज भरला
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळात मी जाणार नव्हतो. परंतु, मी संचालक मंडळात नसलो तर “दादा’ गडबड होईल, अशी शक्यता अनेकांनी वर्तविली. यासाठी अनेकांनी माझ्याकडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आग्रह धरला. त्यामुळेच अर्ज भरला. त्यामुळे यांना बॅंकेचा मोह सुटत नाही का? असा विचार करू नका. खरे तर आम्हा दोघांनाही बॅंकेची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, अशी प्रांजळ भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, खासदार वंदना चव्हाण, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एक किस्सा सांगताना पवार म्हणाले की, 1991 मध्ये स्वर्गीय सुभाषअण्णा कुल व रमेश थोरात यांनी सांगितले की, तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणात यायचे असेल तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी “अ’ वर्गातून निवडणूक लढवा. त्यावेळी बारामतीतील जागा कधी आपल्या विचारांची येत नव्हती, तिथे आपले सहकारी काकडे परिवाराचे वर्चस्व होते, त्यामुळे तिथे निवडणूक लढवायला नाखूष असायचे. पण, या दोघांचे म्हणणे मी ऐकले. त्यावेळी धाडस दाखवले.
लोकांना वैयक्तिक भेटलो. लोकांनी मला निवडणूक दिले अन् मी बॅंकेत गेलो. त्यावेळी बॅंकेच्या ठेवी होत्या 391कोटी रुपये. आज या गोष्टीला 30 वर्ष झाली. बॅंकेच्या ठेवी आता 11 हजार कोटींच्या पुढे गेलेल्या आहेत. राज्यातील काही जिल्हा बॅंकांनी वाट लावली.
अनेक बॅंका रसातळाला गेल्या. जिल्हा परिषदांचे पैसे बुडालेत, शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. तसेच जनता विश्वासाने बॅंकेत पैसे ठेवतात. त्यामुळे बॅंकेने योग्य पद्धतीने वापर करून चांगले ग्राहक शोधणे आवश्यक आहे. पुणे जिल्हा बॅंकेने लाख रूपयापर्यंत शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज देतात, त्याचा अनेक शेतकरी फायदा घेत असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.