लम्पी रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त
तलासरी तालुक्यात अनेक ठिकाणी पाळीव जनावरांना लम्पी या त्वचारोगाने ग्रासले आहे.
तलासरी तालुक्यात जनावरांना त्वचारोग झाल्यामुळे लागवडीची कामे थांबली
कासा : तलासरी तालुक्यात अनेक ठिकाणी पाळीव जनावरांना लम्पी या त्वचारोगाने ग्रासले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भात लावणीची कामे रखडली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर वगैरे वापरणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. तसेच भात खळगे लहान लहान असल्याने ट्रॅक्टरचा उपयोगही करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागांत शेती करण्यासाठी प्रामुख्याने बैलांचाच उपयोग केला जातो. सध्या या बैलांना या त्वचारोगाने ग्रासले आहे.
या रोगामध्ये प्राण्यांच्या अंगावर सुरुवातीला लहान लहान पुरळ येऊन नंतर त्याचे रूपांतर जखमांमध्ये होते. पावसाळ्यात जनावरांच्या गोठय़ात ओलावा तयार होतो व डास आणि गोमाश्या मोठय़ा प्रमाणात जनावरांना चावा घेतात. त्यामुळे या डास, गोमाश्या चावलेल्या त्वचेवर संसर्ग होऊन लम्पी रोग होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जुलै महिना संपला असून ऑगस्ट महिना चालू झाला आहे. सुरुवातीला पावसाने दिलेली उघडीप आणि आता पाऊस आहे तर बैलांना झालेला लम्पी त्वचारोग त्यामुळे तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सध्या भात लावणीची कामे वेगाने सुरू आहेत. भातखळगे लहान असल्याने आम्ही शेतीसाठी बैलांचाच उपयोग करतो. परंतु बैलांना लम्पी त्वचारोग झाल्याने लागवडीची कामे थांबली आहेत. बैलांच्या अंगावरील जखमांमुळे त्यांना कामासाठी जुंपता येत नाही.
-संजय वेडगा, पशुपालक शेतकरी
पावसाळ्यामध्ये जनावरांचा गोठा ओला होतो. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात डास ,गोमाश्या होतात. दंश झालेल्या त्वचेवर संसर्ग होऊन लम्पी हा त्वचारोग होतो. पशुपालकांनी गोठय़ामध्ये औषध फवारणी करून घ्यावी, आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या पशु वैद्यकीय उपचार केंद्रातून उपचार घ्यावेत.
-एम.व्ही.महाजन, पशुधन विकास अधिकारी, प. स. तलासरी.